Latest Posts

दारू पाजण्यास नकार दिल्याच्या रागातून चाकूहल्ला : युवक जखमी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): दारू पाजण्यास नकार दिल्याच्या रागातून एका युवकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१३ जून) दुपारी जुन्या बसस्थानक परिसरात घडली. या हल्ल्यात युवकाच्या हाताला दुखापत झाली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, गणेश केशवसिंग बजगोती (वय ३३) हा जुन्या बसस्थानकाजवळील देशी दारू दुकान परिसरात उभा असताना शहबाज शेख (रा. गोसिया मशीद परिसर, बुद्ध नगर वार्ड बल्लारपूर याने त्याच्याकडे दारू पाजण्याची मागणी केली. मात्र गणेशने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

वाद वाढल्यानंतर संतप्त झालेल्या शहबाज शेख याने जवळील छोट्या चाकूने गणेशच्या डाव्या हातावर वार केला. या हल्ल्यात त्याच्या करंगळीला दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच शेजारी असलेले शेख राजिक शेख वाहब यांनी जखमी गणेशला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.

या प्रकरणी शेख राजिक शेख वाहब यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपी शहबाज शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे करीत आहे.

Latest Posts

Don't Miss