विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): बल्लारशाह रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ८ जून २०२६ रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारशाह रेल्वे स्टेशन परिसरातील वर्धा–बल्लारशाह रेल्वे मार्गावरील किमी क्रमांक ८८९-बी/१२ जवळ अंदाजे ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर संबंधित व्यक्तीस बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी बल्लारशाह रेल्वे पोलीस चौकीत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९४ अन्वये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, गुन्हा क्रमांक १६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह ओळख पटविण्यासाठी शवागारात ठेवण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून उंची सुमारे ५.५ फूट आहे. व्यक्तीचा चेहरा लांबट, रंग सावळा, केस काळे व लांब असून दाढी-मिशा आहेत. अंगात काळ्या रंगाची पँट व नारंगी रंगाचा फुलांची नक्षी असलेला हाफ टी-शर्ट होता. उजव्या हातावर बबलू तर डाव्या हातावर आर.बी.ए. असे गोंदलेले (टॅटू) आहे. तसेच छातीवर हृदयाच्या चिन्हामध्ये बी.ए. असे गोंदलेले आढळून आले. उजव्या हाताच्या बोटांवर व तळहातावर जुन्या जखमांच्या खुणाही आहेत.
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत अथवा त्यांच्या नातेवाईकांबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी तात्काळ स. फौ. परमानंद वासनिक, रेल्वे पोलीस चौकी बल्लारशाह यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
