विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Ballarpur): मुल शहरातील शिवाजीनगर परिसरात पत्नीसोबतच्या कथित संबंधांच्या वादातून एका हमालावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सरकारी धान्य गोदामात काम करणारे मारोती नारायण मेश्राम (वय ४८) यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. या प्रकरणी मुल पोलिसांनी आरोपी अक्षय विलास गोवर्धन (वय ३१) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जखमी मारोती मेश्राम हे मुल येथील सरकारी धान्य गोदामात हमालीचे काम करतात. सुमारे वर्षभरापूर्वी एका यात्रेदरम्यान त्यांची पत्नी सरिता मेश्राम यांची आरोपी अक्षय गोवर्धन याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीचे मेश्राम कुटुंबाच्या घरी येणे-जाणे वाढले. सरिता मेश्राम या आरोपीला भाऊ मानत असल्याचे सांगत असल्या तरी या संबंधांबाबत परिसरात चर्चा सुरू झाल्याने कुटुंबात वाद निर्माण होत होते.
मारोती मेश्राम यांनी आरोपीला घरात येण्यास मज्जाव करण्यासह त्याच्या घरी जाऊन जाबही विचारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही आरोपी घराजवळ फिरत असल्याने दोघांमधील तणाव वाढत गेला होता.
बुधवारी सकाळी मारोती मेश्राम हे नेहमीप्रमाणे कामासाठी सरकारी धान्य गोदामात गेले होते. दुपारी सुमारे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान गोदाम परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता तेथे रक्ताचे डाग, रक्ताने माखलेला लोखंडी रॉड, जखमींची चप्पल आणि दुचाकी आढळून आली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ मुल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी प्रथम चंद्रपूर व त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाला नवे वळण देणारी माहिती जखमींचा अल्पवयीन मुलगा अभय मेश्राम याने पोलिसांना दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, हल्ल्याच्या आदल्या दिवशी आरोपी अक्षय गोवर्धन हा एका दुकानातून लोखंडी रॉड घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने एका व्यक्तीला मारण्याबाबत वक्तव्य केल्याचाही दावा करण्यात आला आहे. हल्ल्याच्या ठिकाणी सापडलेला रक्ताने माखलेला रॉड हाच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पत्नीसोबतच्या संबंधांबाबत मारोती मेश्राम यांनी आरोपीला वारंवार जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपीने पूर्वनियोजित कट रचत लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुल पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी अक्षय गोवर्धन याला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभारे करीत आहेत.
