विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर तसेच मॉडेल करिअर सेंटर, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार ३० एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथे करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत १८ ते २५ वयोगटातील उमेदवारांना ९ महिन्याकरीता इंटर्नशिप करायची संधी उपलब्ध होणार आहेत. त्याअंतर्गत प्रशिक्षणार्थ्याना ९ हजार रुपये मासिक विद्यावेतन दिले जाईल. महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये TALENTRISE TECHNOKRATE PRIVATE LIMITED, MOIL LIMITED NAGPUR, WESTERN COALFIELDS LIMITED यासारख्या नामांकित कंपन्या मार्फत शंभरपेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाणार आहे.
याव्दारे जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच उमेदवारांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी www.pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. जास्तीत जास्त उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
