Latest Posts

चंद्रपुरात साखळीचोरांचा धुमाकूळ : २० मिनिटांत दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन लंपास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): चंद्रपूर शहरात साखळीचोरांनी पुन्हा एकदा धाडसी कारनामा करत अवघ्या २० मिनिटांच्या अंतरात दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पहिली घटना ८ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास उत्तमनगर बंगाली कॅम्प परिसरात घडली. स्वस्त धान्य दुकान चालक तुलसी रजीत शहा (वय ६६) या आपले दुकान बंद करून घरी परतत असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेली. घटनेनंतर त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.

त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत मित्रनगर सिव्हिल लाईन परिसरात दुसरी घटना घडली. किराणा दुकान चालक अन्नपूर्णा महादेव दखणे (वय ७२) या दुकानात असताना दोन तरुण दुचाकीवर तेथे आले. त्यापैकी एकाने पाणी व ग्लास मागून पैसे दिले आणि दुकानाची पाहणी केली. संशयास्पद हालचाली सुरू असतानाच त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून बाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पलायन केले.

दोन्ही घटनांमधील आरोपींचे वर्णन जवळपास सारखे असून एकाचा रंग गोरा, चेहरा गोलसर तर दुसरा हेल्मेटधारी असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी रामनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे पुढील तपास करीत आहेत. शहरातील विविध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss