Latest Posts

चंद्रपूर जिल्ह्यात रविवार काळा दिवस ठरला : दोन भीषण अपघातांत चौघांचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): जिल्ह्यासाठी रविवार अक्षरशः काळा दिवस ठरला. एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

पहिली दुर्घटना तळोधी-नागभीड महामार्गावरील सोनेवाट तळोधी परिसरात सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तिघांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात जगदीश नामदेव नेवारे (२६) व शारदा यादव दुधकुरे (१९) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पियुष कोहळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दुसरी घटना वरोरा-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी गावाजवळ घडली. लग्न समारंभ आटोपून दुचाकीने परतणाऱ्या दोन तरुणांना समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात चंद्रशेखर वालदे (२९) व मयूर हाडके (३३) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मालवाहू वाहनातील अक्षय थेरे व रघुनाथ डाखोरे हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच दिवशी घडलेल्या या दोन भीषण अपघातांनी चंद्रपूर जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss