विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विसापूर येथे दारूच्या नशेत झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी १५ जून रोजी दुपारी घडली. परस्परांतील हाणामारीत दोघांचेही डोके फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे नोंदविले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, विसापूर येथील वॉर्ड क्रं. ५ रहिवासी कृष्णा ड्युटीप्रसाद यादव आणि अनिल प्रभाकर झाडे यांच्यात दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास प्रकाश खनके यांच्या पानठेल्याजवळ वाद झाला. अनिल झाडे हे मद्यधुंद अवस्थेत तेथे झोपले असल्याचे सांगितले जाते. त्यांना तेथून घरी जाण्यास सांगितल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.
हाणामारीदरम्यान एकमेकांवर हल्ला करण्यात आल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत दोघांनाही उपचारासाठी नेण्यात आले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन्ही जखमींनी एकमेकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि दुखापत केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत. त्यानुसार बल्लारपूर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
