विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / तिनसुकिया (आसाम) (Aasam) : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपठार भागात शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तीन सैनिक किरकोळ जखमी झाले असून, लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १२.३० वाजता काही दहशतवाद्यांनी चालत्या वाहनातून काकोपठार येथील लष्करी कंपनीवर गोळीबार केला. जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर देत गोळीबार केला, मात्र जवळच्या घरांचे नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेत कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रत्युत्तराच्या गोळीबारानंतर दहशतवादी स्वयंचलित शस्त्रांचा वापर करत घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यात तिघा सैनिकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
काकोपठार परिसर हा आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असल्याने संपूर्ण भागात उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे. पोलिस आणि लष्करी दलाने मिळून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
