विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात यंदा एका दाम्पत्याने आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप उमटवली. डॉ. वेदांत रेखा किशोर अलमस्त आणि डॉ. नेहा सरिता गंगाधर गिरडकर (अलमस्त) या पती-पत्नीला एकाच समारंभात पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली. या दुर्मीळ यशामुळे उपस्थितांमध्ये कौतुकाची लाट उसळली.
डॉ. वेदांत यांनी वाणिज्य विषयात तर डॉ. नेहा यांनी संगणक विज्ञान विषयात संशोधन करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. दोघांनीही स्वतंत्र विषयात संशोधन करताना एकमेकांना दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यश साध्य झाल्याचे सांगितले जाते.
कोविड-१९ महामारीच्या काळात संशोधन कार्यावर अनेक मर्यादा आल्या होत्या. मात्र, या कठीण परिस्थितीतही त्यांनी हार न मानता सातत्य ठेवले. लॉकडाऊन, संसाधनांची कमतरता आणि तांत्रिक अडचणींवर मात करत त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले.
विशेष बाब म्हणजे, त्यांच्या कुटुंबातील शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत साधी असून याआधीच्या पिढीत उच्च शिक्षणाचा अनुभव नव्हता. अशा परिस्थितीतून पुढे येत पीएच.डी. मिळवणे ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि कष्ट महत्त्वाचे ठरल्याचे दोघांनी नमूद केले.
सध्या हे दोघेही एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर कॅम्पसमध्ये कार्यरत असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या यशामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक संदेश पोहोचला असून, तरुणांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला आहे.
