Latest Posts

परदेशात शिक्षणाकरीता शिष्यवृत्तीसाठी अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसुचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी १५ मे पर्यंत ऑनलाईन सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचा लाभ घेऊ इच्छुणारा विद्यार्थी अनुसुचित जाती, नवबौध्द घटकातील महाराष्ट्रातील रहिवासी असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ४० लाखापेक्षा जास्त नसावे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत २०० च्या आत असावी. तथापी २०० मधील साऊथ वेल्स व आस्ट्रेलिया हे विद्यापिठ योजनेतून वगळण्यात आले आहे. डीजी लॉकरद्वारे कुटूंबातील व्यक्तीची आधारकार्ड व पॅनकार्ड तपासणीसाठी सहमती आवश्यक आहे.

परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गानी इकॉनॉमी क्लास परतीच्या प्रवासासह विमान प्रवास भाडे, निवार्ह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत अदा करण्यात येईल. सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देय राहील.

विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी युएसडी १५४०० तर युकेसाठी जीबीपी ९९०० इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निवार्ह भत्ता विद्यार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तिक बँक खात्यात जमा केला जाईल. विद्यार्थ्यांला आवश्यक ती क्रमीक पुस्तके, वह्या व स्टेशनरी, प्रबंध अहवाल तयार करणे, टायपिंग व बायडिंग, स्थानिक भेटी व इतर अभ्यास सहली प्रवास खर्च, प्रबंधनासाठी आवश्यक खर्च, इतर प्रासंगिक खर्च इत्यादी करीता युएसए व इतर देशासाठी १५०० युएस डॉलर आणि युकेसाठी ११०० जीबीपी आकस्मिक खर्च म्हणुन प्रत्येक वर्षी देण्यात येतील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी १५ मे सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे. त्याची प्रत समाज कल्याण आयुक्तालाय, ३ चर्च रोड पुणे येथे सादर करावी. अर्जाचा नमुना व अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss