विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur): सावली तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील मेहा बीट कक्ष क्रमांक १६० मध्ये पट्टेदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली असून या घटनेने वन्यजीव संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ही घटना २० मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहा बीट परिसरात काही नागरिक सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना तीव्र दुर्गंधी येत असल्याचा भास झाला. संशय आल्याने त्यांनी पुढे जाऊन पाहणी केली असता उपकालव्यालगतच्या जंगल भागात पट्टेदार वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता मृतदेह अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळे परिसरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाची यंत्रणा अलर्ट झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पशुवैद्यकीय पथकाद्वारे वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वनविकास महामंडळाने दिली आहे.
या वेळी विभागीय व्यवस्थापक टी. व्ही. महाडिक, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एच. पेंद्राम, क्षेत्र सहाय्यक डी. एन. ढोले, वनपाल वाय. एस. न्हाने तसेच वनरक्षक एस. एस. चिरंगे, डी. ए. बदने व बी. बी. मस्के यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने हा मृत्यू नैसर्गिक की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत संशय व्यक्त केला जात असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
