Latest Posts

बंद घराचे कुलूप तोडून चोरी : १४.९६ लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा हात साफ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरातील गौरक्षण वार्ड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ लाख ९६ हजार रुपयांच्या सोन्या व हिऱ्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, महादेव झिंगुजी काळे ( ७२), रा. सुचक ले-आउट, गौरक्षण वार्ड, बल्लारपूर हे पत्नीसमवेत वास्तव्यास आहेत.२४ एप्रिल रोजी त्यांच्या पत्नीला दुखापत झाल्याने उपचारासाठी चंद्रपूर येथे जावे लागले. त्यानंतर ते मुलीकडे मुक्कामास गेले होते. २६ एप्रिल रोजी सकाळी ते घरी परतले असता घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा आढळला.

घरात पाहणी केली असता लोखंडी कपाट उघडे असून सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते. चोरट्यांनी कपाटातील सुमारे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने व २० हजार रुपयांचे हिऱ्याचे दागिने असा एकूण १४ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बाहेरगावी जाताना घरातील दागदागिने व रोकड सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच शेजारी किंवा विश्वासू व्यक्तींना माहिती देऊनच घर बंद करून जावे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना टाळता येतील.

Latest Posts

Don't Miss