विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर ( chandrapur ) : मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदगाव परिसरात रात्रीच्या वेळी टायर जाळून रास्ता रोको करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणत असभ्य वर्तन करणाऱ्या दोघांविरुद्ध मुल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी केतन विनोद नरसपुरे (वय २७ ) व पवन अरुण भंडारे (वय २३), दोघेही रा. नांदगाव, ता. मुल यांनी १९ मार्चच्या रात्री उशिरा ते २० मार्चच्या पहाटे दरम्यान गोडपिपरी ते बेबाळ मार्गावर टायर जाळून रास्ता रोको केला. या घटनेमुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला.
डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता आरोपींनी पोलिसांच्या वाहनाची चाहूल लागताच सुरुवातीला पळ काढला. त्यानंतर पुन्हा माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघेही टायर जाळून रस्ता अडवत असल्याचे आढळले.
दरम्यान, पोलिसांनी आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी त्यांना अटकाव केला तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने आरडाओरड करत असभ्य वर्तन केले. यावेळी ते दारूच्या नशेत असल्याचेही निदर्शनास आले. वैद्यकीय तपासणीत केतन नरसपुरे हा मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलीस हवालदार जगदीश गुरुनुले यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम १२६(२), २२१, २८५, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील कुळमेथे करीत आहेत.
