Latest Posts

स्वाधार योजनेतील अर्ज त्रुटी दुरुस्तीसाठी २५ मार्चपर्यंत अंतिम मुदत

– संबंधित विद्यार्थ्यांनी त्रुटींची पुर्तता

– तत्परतेने करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांपैकी त्रुटी आढळलेल्या अर्जांची पूर्तता करण्यासाठी २५ मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेनुसार अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व निर्वाह भत्ता यासाठी आर्थिक सहाय्य थेट आधार-संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.

सन २०२५-२०२६ या वर्षासाठी अर्ज https://hmas.mahait.org यापोर्टलवरून ऑनलाइन स्वीकारण्यात येत असून विद्यार्थ्यांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. अर्ज पडताळणीची प्रक्रिया वेगात सुरू असून तपासणीदरम्यान अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटी संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात ( sent back) आल्या आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना दूरध्वनी, व्हॉट्सअॅप तसेच महाविद्यालयांमार्फत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. याला अजून संबंधित विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी आजवर वेळोवेळी आवाहन करण्यात आले असून आता २५ मार्च २०२६ पूर्वी आपल्या अर्जातील त्रुटी दूर करून अर्ज मंजूर करून घ्यावा, असे कळविण्यात आले आहे. यानंतर अर्ज नामंजूर करण्यात येणार असून योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सामाजिक न्याय विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी अर्जाची पूर्तता करण्यासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय, नागपूर येथे प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रद्धानंद पेठ, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss