विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : पाच लाख रुपये माहेरून आणण्यासाठी पत्नीचा सातत्याने छळ, मारहाण व मानसिक त्रास दिल्याच्या प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी पती व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या पती व तीन वर्षांच्या मुलीसह राहत होत्या. त्या घरकामासोबत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती पेपर प्लेट (पत्रावळी) निर्मितीचा व्यवसाय करतात.
लग्नानंतर काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर पतीला दारूचे व्यसन लागले असून ते वारंवार दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत अश्लील शिवीगाळ, मारहाण करत असल्याची तक्रार आहे. तसेच पती व नणंद यांनी मिळून माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकत छळ केल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपी पती मिलींद भाऊराव मांढरे व नणंद ग्यानेश्वरी विठ्ठल परशिवे अशी नावे असून, दोघांनीही संबंधित महिलेला शारीरिक व मानसिक त्रास देत पैशांसाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
२४ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पतीने दारूच्या नशेत मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली होती. यानंतर काही काळ समेट झाला असला तरी परिस्थितीत सुधारणा झाली नाही. दरम्यान, पतीवर कर्जाचा ताण वाढल्याने त्यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही बाब समोर आली आहे.
याप्रकरणी २० डिसेंबर २०२५ रोजी रुग्णालयात संबंधित महिलेला मारहाण करून हाकलून लावल्याचा आरोप नणंदेवर आहे. त्यानंतर महिला माहेरी राहू लागली. पुन्हा संसार सुरू करण्यासाठी प्रयत्न करूनही पती व नणंद यांनी पाच लाख रुपये आणल्याशिवाय नांदविणार नाही, अन्यथा सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३(५) व ८५ अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करत आहेत.
