Latest Posts

शिबला येथे पत्नीचा छळ करून तिचा खुन केल्या प्रकरणी आरोपी राहुल मरसकोल्हे यांस जन्मठेपेची शिक्षा

– पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी (Ghatanji): झरी जामणी तालुक्यातील शिबला येथे पत्नीला जाळून तिचा खुन केल्या प्रकरणी पांढरकवडा येथील न्यायाधीश १ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड. प्रशांत मानकर यांनी मांडली.

घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, शिबला (ता. झरी जामणी) येथील आरोपी राहुल मरसकोल्हे (वय २८) याने पत्नी आराधना राहुल मरसकोल्हे हिने भाजी लवकर तयार केली नाही म्हणून तिला पेटत्या दिव्याची वात लाउन तिला पेटवून देउन जाळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिचा गंभीर अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा रिपोर्ट तिच्या आईने पाटण पोलीस ठाण्यात दिला. त्यावरुन अपराध क्रंमाक १०/२०२३ अन्वये भादंवि कलम ३०७, ४९८ (अ) व ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर प्रकरणाचा तपास पाटण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी करुन पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

सदर प्रकरणात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाची बाजू ग्राहय धरुन न्यायाधीश १ व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी आरोपी राहुल मरसकोल्हे यांस भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी ६ महिण्याची अतिरिक्त शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. तसेच भादंवि कलम ४९८ (अ) मध्ये ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी ३ महिण्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

सदर प्रकरणात शासनाची बाजू सहाय्यक सरकारी अधिवक्ता ऍड. प्रशांत मानकर यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पो. हे. काॅ. अनिल कवाडे यांनी सहकार्य केले. तर आरोपी राहुल मरसकोल्हे यांचे तर्फे ऍड. सिद्धार्थ लोढा यांनी काम पाहिले.

Latest Posts

Don't Miss