विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सांगली (Sangli): देशाची टर्मरिक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीला आता राजस्थानची राजधानी जयपूर, भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळुरू आणि राजवाड्यांचे शहर म्हैसूर या महत्वाच्या शहरांशी विशेष रेल्वेने जोडले जाणार आहे. म्हैसूर-जयपूर विशेष एक्स्प्रेस शनिवारपासून (१८) सांगली स्थानकावरून धावणार आहे.
राजस्थानातील व्यापाऱ्यांसाठी सांगली हे महत्त्वाचे बाजारपेठ असून, हळद, गूळ व बेदाण्याच्या व्यापारासाठी त्यांचा नेहमीचा वावर असतो. यामुळे राजस्थानमधील नागरिकांची रेल्वेसाठी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यानुसार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ही विशेष सेवा सुरू केली आहे.
गाडीची प्रमुख थांबे –
ही गाडी म्हैसूरहून जयपूरकडे जाताना बंगळुरू, हुबळी, सांगली, वडोदरा, अहमदाबाद, आबू रोड, फालना अशा प्रमुख शहरांमध्ये थांबेल. जयपूरहून परतीच्या मार्गावरही ही गाडी सांगलीत थांबेल. जर प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक मिळाला, तर ही सेवा भविष्यात नियमित एक्स्प्रेस म्हणून सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे.
म्हैसूर-जयपूर विशेष एक्स्प्रेस (क्र. ०६२३१) –
प्रस्थान: १८ व २५ ऑक्टोबर – म्हैसूर: शनिवारी रात्री ११:५५, बंगळुरू: रविवारी २:१०, हुबळी: रविवारी ९:४०, सांगली: रविवारी दुपारी ३:४५, जयपूर: सोमवार सायंकाळी ६:४०
जयपूर-म्हैसूर विशेष एक्स्प्रेस (क्र. ०६२३२) –
प्रस्थान: २१ व २८ ऑक्टोबर – जयपूर: सोमवार सकाळी ४:००, सांगली: बुधवार सकाळी ७:१८, म्हैसूर: गुरुवार सकाळी ३:३०
बुकिंगसाठी आवाहन –
प्रवाशांनी IRCTC संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपद्वारे तिकिटे बुक करावी. सांगली स्थानक येथून प्रवास करणाऱ्यांनी बुकिंग करताना सांगलीचा उल्लेख करण्याचे आवाहन प्रवासी संघटनांकडून करण्यात आले आहे.
