विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / शिर्डी (Shirdi): साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात तब्बल ७७ लाख १४ हजार रुपयांच्या साहित्याचा अपहार झाल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय काळे (रा. कोपरगाव) यांनी शिर्डी पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी संस्थानचे ४७ विद्यमान व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करण्यात आली आहे.
२०१७ ते २०२३ दरम्यान अपहार –
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, विद्युत विभागातील डेड स्टॉक रजिस्टरमध्ये बनावट नोंदी करण्यात आल्या. यासोबतच प्रत्यक्ष खरेदी केलेल्या साहित्याची नोंद न करता, संगनमताने साहित्य गायब करण्यात आले. २०१७ ते २०२३ या सहा वर्षांच्या कालावधीत हा अपहार झाला असल्याचा आरोप आहे.
यापूर्वी, २३ मे २०२२ रोजी केवळ २२ हजार ५०० रुपयांच्या साहित्याच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेवढ्यापुरते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
लेखा परीक्षणात अपहार स्पष्ट –
या प्रकरणाबाबत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, शासनमान्य लेखा परीक्षणात विद्युत विभागात ५१.६२ लाख रुपयांच्या साहित्याची अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासन करत असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
