विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / जैसलमेर (राजस्थान) : जैसलमेर-जोधपूर महामार्गावर सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात खासगी बसला अचानक आग लागून २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. ही बस एकूण ५७ प्रवाशांना घेऊन जोधपूरकडे जात असताना ही दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, बसच्या सेंट्रल एसी सिस्टममध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. केके ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी कंपनीची ही नवी बस फक्त पाच दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.
आग लागल्यानंतर बसच्या आत धुराचा फैलाव झाल्याने दरवाजा आपोआप लॉक झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीषण गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी काहींनी काचा फोडून खिडक्यांतून उड्या मारल्या, मात्र अनेकांना बाहेर पडता आलं नाही.
या भीषण दुर्घटनेत सेत्रावा येथील लवारन गावचे महेंद्र मेघवाल यांनी आपलं संपूर्ण कुटुंब गमावलं. महेंद्र, त्यांची पत्नी आणि तीन मुलं यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. महेंद्र जैसलमेरमध्ये काम करत होता आणि दिवाळीसाठी गावी परत जात असताना हा अपघात घडला.
घटनास्थळी उपस्थित थईयात गावातील कस्तूर सिंह यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर प्रवाशांनी काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी आरडाओरडा केला, परंतु अग्निशमन दल बराच वेळ पोहोचले नाही. शेवटी लष्कराच्या जवानांनी जेसीबीच्या साहाय्याने बसचा दरवाजा तोडून बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मते, बसमधून केवळ १६ जणांना वाचवण्यात आले.
जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येत आहे. जळालेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळखल्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राजस्थान हादरले असून, प्रशासनाने अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
