Latest Posts

इंडिगोचा ताफा होणार आणखी मजबूत : ३० नवीन ए-३५० विमानांची खरेदी

– छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील कामगारांना दिवाळी बोनसची आनंदवार्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai): देशातील सर्वात अव्वल आणि विश्वासार्ह विमान कंपनी म्हणून ओळख असलेल्या इंडिगो (IndiGo) कंपनीने आपल्या ताफ्यात आणखी वाढ करत ३० नवीन ए-३५० (Airbus A३५०) या आलिशान आणि अत्याधुनिक विमानांची खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विमानांमध्ये रोल्स रॉईस (Rolls-Royce) या जगप्रसिद्ध कंपनीचे इंजिन बसविण्यात येणार आहे.

ए-३५० आलिशान, प्रशस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज –
एअरबस कंपनीच्या ए-३५० या विमानप्रकाराची रचना अत्यंत आधुनिक असून, प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ती ओळखली जाते. इंडिगोने याआधी या प्रकारच्या ३० विमानांची खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. आता नव्याने दिलेल्या ३० विमानांच्या ऑर्डरमुळे कंपनीच्या ताफ्यात एकूण ६० ए-३५० विमाने समाविष्ट होणार आहेत.

सध्या इंडिगोच्या ताफ्यात ४०० विमाने कार्यरत आहेत. देशातील विमान वाहतूक क्षेत्रात कंपनीचा बाजारातील हिस्सा तब्बल ६० टक्क्यांहून अधिक आहे. तसेच इंडिगोने यापूर्वी विविध प्रकारच्या ९०० विमानांची ऑर्डर दिली असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासात कंपनीने एक भक्कम स्थान निर्माण केले आहे.

विमानतळ कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसची मोठी भेट –
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी या दिवाळीत आनंदाची बातमी मिळाली आहे. विमानतळावरील विविध विभागांतील कामगारांना दिवाळी बोनस म्हणून ३५ हजार रुपये देण्यात आले आहेत.

लोडर, ड्रायव्हर, क्लिनर या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपयांचा बोनस, तर व्हाईट कॉलर कर्मचाऱ्यांना त्यांच्या एक बेसिक वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाबाबत विमानतळावरील सेवा पुरवठादार कंपनीच्या व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत संयुक्त सरचिटणीस संजय कदम, सुजित कारेकर, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कामगारांच्या हिताच्या दृष्टीने झालेल्या या निर्णयामुळे दिवाळीपूर्वी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भारतीय कामगार सेनेने व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.

Latest Posts

Don't Miss