Latest Posts

राज्यातील अतिवृष्टीचा तडाखा : ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ८३ लाख शेतकरी बाधित

– नुकसानभरपाईसाठी ७ हजार ९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृषी क्षेत्रात मोठे संकट ओढवले आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, तब्बल ६८ लाख १३ हजार २४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, या आपत्तीचा परिणाम ८३ लाख १२ हजार ९७० शेतकऱ्यांवर झाला आहे. या नुकसानीसाठी ७ हजार ९८ कोटी ६८ लाख २१ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

१७ दिवसांत पूर्ण झाले पंचनामे –
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तब्बल १७ दिवसांचा कालावधी लागला. महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने संयुक्तरीत्या केलेल्या पंचनाम्यानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रारंभी सुमारे ६१ लाख ११ हजार २२३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान निश्चित झाले होते.

मात्र, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर, धुळे आणि नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांपूर्वीच पंचनामे पूर्ण झाले होते. त्यामुळे नव्याने पंचनामे करताना सरकारने या जिल्ह्यांसाठी विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर करण्यात आली.

वाढलेले नुकसान क्षेत्र –
या निर्णयानंतर सुमारे ७ लाख २ हजार १९ हेक्टर क्षेत्र अतिरिक्त नुकसानग्रस्त म्हणून समाविष्ट झाले. परिणामी एकूण नुकसान क्षेत्राचा आकडा वाढून ६८ लाख १३ हजार २४२ हेक्टर इतका झाला आहे.

शेतकऱ्यांना थेट मदतीची योजना –
या पंचनाम्यांनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत (NDRF) नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. राज्याचा मदत व पुनर्वसन विभाग लवकरच शासन निर्णय (G.R.) जारी करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करणार असल्याचे संकेत आहेत.

शेवटचा शब्द –
राज्यातील खरीप हंगामाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासन निर्णय लवकर जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे हीच सध्या काळाची गरज असल्याचे कृषी क्षेत्रातून मत व्यक्त होत आहे.

Latest Posts

Don't Miss