विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : महाराष्ट्र शासनाच्या सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या ७२ लिपिक टंकलेखक पदासाठी ५ नोव्हेंबर पर्यंत सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचा माजी सैनिकांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरती परीक्षा टीसीएस आयओएन मार्फत घेतली जाणार आहे. भरती प्रकियेत सहभागी होण्यासाठी ५ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे. यासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराचे ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे. आवश्यक शैक्षणिक पात्रता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावी. मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण असणे, तसेच सशस्त्र दलात किमान १५ वर्षाची सेवा पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी १ हजार रुपये आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी ९०० रुपये राहील. पदभरती बाबत सविस्तर माहिती www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
