Latest Posts

पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई द्या : आमधरे यांची जयकुमार रावल यांच्याकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): यंदाच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकरी उध्वस्त झाले आहेत. घरादाराची वाताहत आणि उभ्या पिकांचे नुकसान होऊन दिवाळीच्या उंबरठ्यावर शेतकरी कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हुकूमचंद आमधरे यांनी राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या भेटीत आमधरे यांनी शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता सध्याची २ हेक्टरपर्यंत असलेली नुकसानभरपाईची मर्यादा शिथिल करून ती पुन्हा ३ हेक्टरपर्यंत करावी, अशी स्पष्ट मागणी केली. शासनाने दिवाळीपूर्वीच आशेचा दिवा शेतकऱ्यांच्या घरात पेटवावा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा समावेश –
रावल यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात आमधरे यांनी पुढील मागण्या मांडल्या –
– बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार ची तातडीची मदत करावी.
– पूरस्थिती अत्यंत बिकट असलेल्या भागांमध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.
– सर्व पिकांसाठी भावांतर योजना लागू करावी.
– शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.
– सरकारी योजनांची मंजुरीसाठी लागणारी कागदोपत्री प्रक्रिया सुलभ करावी.
– ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृहाची सुविधा शहरांमध्ये उपलब्ध करावी.
– मनरेगा योजना प्रभावीपणे लागू करून प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कामे सुरू करावीत.
– पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मोबदला आणि सरकारी नोकरी द्यावी.

शेतकऱ्यांचे पुनर्वसन हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे, असे आमधरे यांनी ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता व्यवस्थात्मक आणि तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss