Latest Posts

रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू : विरूर वनपरिक्षेत्रात खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): मध्य चांदा वनविभाग अंतर्गत त विरूर वनपरिक्षेत्रातील विरूर उपक्षेत्रात रेल्वेच्या धडकेत एका मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील सिंधी नाल्याच्या पुलावर हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरूर रेल्वे स्टेशन परिसरालगत दक्षिण मध्य रेल्वे लाईनवरील सिंधी नाल्याच्या पुलाजवळ पोल क्रमांक १५८/सी-१३ येथे एका वन्यप्राण्याचा मृतदेह आढळल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार विरूर उपक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी सकाळी सुमारे ७ वाजता घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, मृत वन्यप्राणी बिबट्या (मादी) असल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर उपविभागीय वन अधिकारी मंगेश डी. गिरडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश व्ही. दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. इंगळे तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम. पी. तेलंगे आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. भाग्यश्री बेलसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासणीदरम्यान सदर मादी बिबट्याचा मृत्यू रेल्वेच्या धडकेत झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर सुमठाना येथील रोपवाटिकेत वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ. एम. पी. तेलंगे व डॉ. भाग्यश्री बेलसरे यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वनविभागाच्या नियमानुसार सुमठाना रोपवाटिकेतच मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.

या कार्यवाहीदरम्यान क्षेत्र सहाय्यक आर. जे. गुरनुले, नियत वनरक्षक आर. ए. मुन (विरूर), आर. टी. वैघ (डोंगरगाव) आणि एन. एल. लाडसे (कविठपेट) यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवर वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली असून, या घटनेमुळे वन्यजीव संवर्धनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Latest Posts

Don't Miss