– वणा नागरीक सहकारी बँकेच्या ११ व्या शाखेचे लोकार्पण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शून्य टक्के थकीत कर्जदार असलेल्या वना नागरिक सहकारी बँकेने चोवीस वर्षात जिल्ह्यासोबतच चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात बँकेच्या शाखा उघडून मोठा विस्तार केला आहे. त्यांचे अनुकरण इतर बँकांनी करुन जिल्ह्याचे सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
हिंगणघाट येथील वना नागरीक सहकारी बँकेच्या मांडगाव येथील ११ व्या शाखेच्या नवनी इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, माजी राज्यमंत्री रणजीत काबंळे, माजी आमदार राजु तिमांडे, वणा नागरीक बँकेचे अध्यक्ष तथा हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, समुद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिंमतराव चतूर, समुद्रपूर नगर पंचायतीच्या अध्यक्षा योगिता तुळणकर, सुरेंद्र कोकेकर, नरेंद्र थोरात, सुनील गफाट, किशोर दिघे, वना नागरिक सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश सायंकार आदी उपस्थित होते.
कमी कालावधीमध्ये वना नागरिक बँकेने ११ शाखा सुरु करुन उत्कृष्टपणे बँक चालवून गरीबांना कर्ज देण्यासोबतच नागरिकांना रोजगाराच्या संधी सुध्दा उपलब्ध करुन दिल्या आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली असतांना बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने बँकेला जीवंत ठेवण्यासाठी १६३ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देऊन रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचा रद्द झालेला परवाना प्राप्त करुन घेतला असल्याचे डॉ. पंकज भोयर म्हणाले.
केंद्र शासनाच्यावतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करीत असतांना राज्यातील १५ सेवा सहकारी संस्थाचे संगणकीकरण करण्यात येत असून यामुळे सहकार क्षेत्राला वैभव प्राप्त होईल, असा आशावाद डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.
बँक चालविणे सोपी गोष्ट नसून वना नागरिक बँकेने जिल्ह्यासोबतच इतर जिल्ह्यात अशा ११ शाखा सुरु केल्या आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. दहेगाव गोसावी येथे बँक नसल्यामुळे शेतकऱ्यां ना केळझर येथे जावे लागतात. यासाठी वना नागरिक बँकेने शाखा उघडून शेतक-यांनी दहा किलोमीटर जाण्याची पायपीट वाचवावी असे, आ.समीर कुणावार म्हणाले.
वना नागरिक बँकेने ३०० कोटी ठेवी जमा करुन १९६ कोटीचे सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्यां ना कर्ज दिले असून नागरिकांकडून नियमित कर्जाची वसुली सुध्दा होत आहे. हीच बँक चालविण्याची पध्दत असल्याचे रणजित काबंळे म्हणाले. यावेळी राजू तिमांडे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्री संघाचे संचालक, नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
