विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : हृदयविकाराच्या झटक्याच्यावेळी तत्काळ हृदय व फुफ्फुस पुनरुजीवन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आरोग्य संस्थांमध्ये १९ ऑक्टोंबर पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी केले आहे.
सप्ताहादरम्यान नागरिकांमध्ये सीपीआर या जीवनरक्षक कौशल्याचे महत्व व त्याची योग्य कृती याबाबत जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांमध्ये हृदयविकाराच्या वेळी तत्काळ सीपीआर देण्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि जीवनरक्षक कौशल्ये विकसित करणे हा आहे.
प्रशिक्षित व्यक्तीने वेळेवर सीपीआर दिल्यास जगण्याची शक्यता लक्षणीयरीत्या सुधारते. सीपीआर न दिल्यास काही मिनिटांतच मेंदूला हानी पोहोचू शकते आणि प्रत्येक मिनिटाच्या विलंबामुळे जगण्याची शक्यता सुमारे १० टक्के कमी होते.
सीपीआर महत्व आणि आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर कसा करावा याबद्दल माहिती देण्यासाठी आरोग्य शिक्षण व माहिती प्रसारणाची साधने तसेच समाजमाध्यमाध्यमाचा प्रभावीपणे वापर केला जाईल. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य संस्थांमधील इतर कर्मचाऱ्यांसाठी तातडीच्या परिस्थितीत सीपीआर देण्यासाठी आवश्यक प्रात्याक्षिक प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://echo.zoom.us/webinar/register/WN-fsVmS?OvR2tE3szTQUocg यावर नोंदणी करावी. तसेच व्हिडीओद्वारे प्रशिक्षण https://youtu.be/dl4qyodyF84?si=O1JwjR7Za1mn98xe या लिंकवर घेता येणार आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
