विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir): जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.
घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने तत्काळ कारवाई हाती घेतली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून कारवाईला गती दिली आहे. अलीकडच्या काळात सीमेपलीकडून दहशतवादी हालचालींना पुन्हा वेग आला असून, त्याच पार्श्वभूमीवर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवली. वारसन परिसरातील ब्रिजथोर जंगलात दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला.
या कारवाईदरम्यान दोन एके-सिरीज रायफल, चार रॉकेट लाँचर, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि युद्धसाहित्य जप्त करण्यात आलं आहे. श्रीनगरस्थित चिनार कोरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
परिसरात अजून काही दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर जंगलात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते, तर दोन जवान शहीद झाले होते.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक अमीर अहमद दार हा शोपियानचा रहिवासी असून, तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर २०२३ पासून तो सक्रिय होता. पहलगाम हल्ल्यानंतर सोडण्यात आलेल्या १४ वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.
