विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (New Delhi) : भारतीय रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत अनेकदा प्रवाशांकडून तक्रारी येत असतात. निकृष्ट दर्जाचे आणि अस्वच्छ जेवण दिल्या जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. मात्र, यावेळी देशातील नव्या अमृत भारत एक्स्प्रेस या लग्झरी ट्रेनमध्येच अशा प्रकारची घटना घडल्याने प्रवाशांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या पॅकेटचे आणि प्लेट्सचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये टाकून दिलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स आणि उरलेले अन्न दिसत आहे. काही प्रवाशांनी असा दावा केला आहे की, त्यांना धुऊन पुन्हा वापरल्या गेलेल्या डिस्पोजेबल प्लेट्सवर जेवण दिलं गेलं. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या केटरिंग सेवांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रवाशांनी सांगितले की, जेवण देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेट्स आणि बॉक्स धुऊन पुन्हा वापरले जात आहेत. काहींनी तर सांगितले की, त्यांच्या जेवणाच्या डब्यांवर जुन्या अन्नाचे आणि तेलाचे डाग स्पष्टपणे दिसत होते. हेच फोटो एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केले आणि काही तासांतच ते व्हायरल झाले. अनेक युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
एका युजरने टीका करत लिहिले, हे फोटो पाहिल्यानंतर आता मला ट्रेनमध्ये काहीही ऑर्डर करावंसं वाटत नाही. तर दुसऱ्याने टिप्पणी केली, डिस्पोजेबल प्लेट्स धुऊन पुन्हा वापरणं हे स्वच्छतेच्या नियमांचं उघड उल्लंघन आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणं अमान्य आहे.
काहींनी उपरोधिक भाषेत लिहिले की, रेल्वेने आता शाश्वत विकासात नवा टप्पा गाठला आहे — प्लेट्स फेकल्या जात नाहीत, तर धुतल्या जाऊन पुन्हा वापरल्या जातात.
या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने संबंधित केटरिंग एजन्सीकडून अहवाल मागवला असून तपास सुरू केला आहे. प्रवाशांच्या तक्रारींची पडताळणी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेतील अन्नसेवेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न मध्यवर्ती ठरला आहे.
