विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नक्षलवादी चळवळीच्या इतिहासात एक ऐतिहासिक आणि निर्णायक वळण देणारी घटना घडली आहे. माओवादी संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा नेता आणि विचारवंत मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने गडचिरोली पोलिसांसमोर रात्री उशिरा शस्त्रे टाकत आत्मसमर्पण केले. त्याच्यासोबत ६० नक्षलवाद्यांनीही शरणागती पत्करली, ही घटना नक्षल चळवळीला मोठा धक्का देणारी ठरली असून, देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे यश मानले जात आहे.
नक्षल चळवळीतील महत्त्वाचा नेता शरणात –
भूपतीचा नक्षल चळवळीतील प्रवेश १९७०च्या दशकात गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यातून झाला. तो माओवादी नेते किशनजी (मल्लोजुला कोटेश्वरराव) याचा धाकटा भाऊ असून, किशनजी २०११ साली कोलकात्याजवळ चकमकीत ठार झाला होता. भूपतीवर देशभरात ६ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
संघटनेच्या धोरणात्मक नियोजन, केंद्रीय समिती, हिंसक मोहीमा आणि पत्रक प्रकाशन यामध्ये त्याचा मोठा सहभाग होता. अभय या टोपणनावाने तो माओवादी विचारांचे पत्रकं प्रसिद्ध करत असे.
संघटनेत फूट, सरकारकडे शांतीसाठी साद –
काही दिवसांपूर्वी भूपतीने केंद्र सरकारकडे शांती चर्चेसाठी आणि तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी पत्र पाठवले होते. मात्र, माओवादी नेतृत्वाने त्याला प्रखर विरोध दर्शवला आणि त्यामुळे संघटनेत मतभेद आणि फूट निर्माण झाली.
याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यशस्वी ठरले आणि भूपतीसह अन्य ६० नक्षलवाद्यांनी औपचारिक आत्मसमर्पण केले.
सुशिक्षित, पण हिंसक कारवायांचा सूत्रधार –
६९ वर्षीय भूपती हा बीकॉम पदवीधर असून, तो महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. त्याची पत्नी तारक्का हिने मागील वर्षीच आत्मसमर्पण करून पुनर्वसन शिबिरात प्रवेश केला आहे.
माजी महासचिव बसवराजूच्या मृत्यूनंतर, भूपतीला पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी दावेदार मानले जात होते. त्यामुळे त्याचे आत्मसमर्पण माओवादी चळवळीसाठी धक्कादायक आणि निर्णायक टप्पा ठरले आहे.
संघटनेच्या मनुष्यबळावर गंभीर फटका –
हे आत्मसमर्पण गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठे असून, यामध्ये संघटनेतील अनेक प्रमुख कॅडरचा समावेश आहे. यामुळे माओवादी संघटनेच्या रणनीती, मनुष्यबळ आणि गतीशीलतेवर गंभीर परिणाम झाला आहे. सुरक्षा यंत्रणांसाठी ही घटना मोठे यश ठरली असून, आगामी काळातील मोहीमेसाठी नवे दालन खुले झाले आहे.
