विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / भामरागड (Bhamragal): प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष व आदी कर्मयोगी अभियानांतर्गत ग्रामपंचायत इरकडुम्मेचा पाच वर्षांचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सिंचन, सांस्कृतिक उपक्रम तसेच रोजगारनिर्मितीपर्यंत सर्व क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
ग्राम विकास आराखडा तयार करण्यापूर्वी गावातील शिवार फेरी घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने या प्रक्रियेत सहभागी झाले. शाळा व अंगणवाडी दुरुस्ती, आरोग्य उपकेंद्रासाठी सुविधा, रस्ते व नाली बांधकाम, गोदाम उभारणी, घरकुल विकास, तलावातील गाळ काढणे व सिंचन सुविधांचा विस्तार, खेळाची मैदाने, सार्वजनिक वाचनालय, गोटूल सुशोभीकरण, महिला बचत गटांना प्रशिक्षण व लघुउद्योग प्रोत्साहन, मामा तलावात मत्स्यबीज निर्मिती केंद्र उभारणी, गौण वनोपज संकलन-विक्री व व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
सरपंच शैला आत्राम यांनी सांगितले की, हा पाच वर्षांचा विकास आराखडा प्रत्यक्षात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. ग्रामपंचायत अधिकारी दिनेश सराटे यांनी म्हटले की, या अभियानाचा उद्देश गावांचा सर्वांगीण विकास साधणे आहे, त्यामुळे आराखड्यात सर्व महत्त्वाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे गावाचा नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होईल.
यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच कटिया कंगाली, गावपाटील सन्याशी मटामी, दिस्सू इष्टम, पंचायत समिती कृषी अधिकारी सुशील टेभूर्णे, गोविंदा इष्टाम, सोमजी उसेंडी, गावातील आशा, अंगणवाडी सेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
