विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : मुल तालुक्यातील सोमनाथ पर्यटन स्थळाजवळ दुर्दैवी घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात ५२ वर्षीय अन्नपूर्णा बिलोणे या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये घडली.
अन्नपूर्णा बिलोणे आपल्या घराच्या अंगणात भांडी घासत असताना वाघाने अचानक हल्ला चढवला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पती तुलसीराम बिलोणे बाहेर आले. त्यांनी पत्नीला वाचवण्यासाठी थेट वाघाशी दोन हात केले.
प्रथम त्यांनी पत्नीला ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र निष्फळ ठरल्यानंतर काठी घेऊन वाघावर प्रहार केला. हल्ल्याचा जोर कमी झाल्याने वाघ पळून गेला, पण तोपर्यंत अन्नपूर्णा यांचा जागीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पती तुलसीराम बिलोणे यांना तातडीची २० हजार रुपयांची मदत दिली.
