Latest Posts

धबधब्यांवरून वीज निर्मितीची नवी दिशा : महाराष्ट्रात लघु जलविद्युत प्रकल्पांची शक्यता वाढली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सातारा (Satara) : ऊर्जेची वाढती गरज आणि पारंपरिक वीजनिर्मितीतील मर्यादा पाहता, पर्यावरणपूरक व स्वस्त ऊर्जास्रोतांचा शोध ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत, पश्चिम घाटात पावसाळ्यात कोसळणाऱ्या नैसर्गिक धबधब्यांचा उपयोग करून लघु जलविद्युत प्रकल्प उभारण्याची संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे.

राज्यातील अनेक धबधबे चार ते सहा महिने सातत्याने वाहत असतात. या पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग करून टर्बाईन चालवून वीज निर्माण करणे शक्य आहे. अशा प्रकल्पांची उभारणी करून स्थानिक ऊर्जेची गरज भागवता येऊ शकते. यामध्ये इंधनाचा खर्च लागत नाही आणि प्रदूषणही होत नाही.

उंची आणि कार्यक्षमता –
साधारणतः १० मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीचा धबधबा लघु जलविद्युत प्रकल्पासाठी उपयुक्त मानला जातो. उंची जितकी अधिक, तितका पाण्याचा वेग आणि दाब अधिक, यामुळे टर्बाईन अधिक कार्यक्षमतेने वीज निर्माण करू शकते. अगदी ५ मीटर उंचीवरसुद्धा, तांत्रिक नियोजनाने प्रकल्प उभारता येतो.

खर्च आणि कालावधी –
२ हजार वॅट क्षमतेच्या यंत्रणेसाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये खर्च येतो. बांधकामाचा स्वतंत्र खर्च याखेरीज आहे. हे प्रकल्प वर्षातून ५ ते ६ महिने कार्यरत राहतात. मात्र टर्बाईन व इतर यंत्रणांची योग्य देखभाल केल्यास ते अनेक वर्षे कार्यक्षम राहतात, असे महा-जेनकोचे म्हणणे आहे.

कोळकेवाडीत प्रयोगशीलता –
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडीत १५ ते २० मीटर उंच धबधब्यावर लघु जलविद्युत प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरत असून, यामुळे इतर भागांतील संभाव्यता अधिक ठळक झाली आहे.

पूर्वोत्तर भारताकडून प्रेरणा –
नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांनी यापूर्वीच अशा प्रकल्पांमध्ये पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातही ऊर्जा विकास महामंडळ व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

शाश्वत ऊर्जेसाठी मोठी संधी –
धबधब्यांवरील लघु प्रकल्प ही केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर बाब आहे. डोंगराळ व दुर्गम भागांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी हे प्रकल्प आदर्श ठरू शकतात.

Latest Posts

Don't Miss