विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / ठाणे (Thane): कर्तव्यावरील हलगर्जीपणामुळे झालेली बदली रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या पोलीस अमलदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याने केली असून, संबंधित पोलीस अमलदाराचे नाव विवेक जाधव असे आहे.
विवेक जाधव यांची १८ सप्टेंबर रोजी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यावरून ठाणे शहर पोलिस मुख्यालयात मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. कर्तव्यात कसुरी झाल्याच्या कारणावरून ही बदली करण्यात आली होती. मात्र, या बदलीला आव्हान देण्यासाठी जाधव यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. या दाव्यासोबत त्यांनी काही वैद्यकीय कागदपत्रे जोडली होती, ज्यात ६ ऑगस्ट रोजी त्यांनी औषधोपचारासाठी आवश्यक असलेली माहिती कर्तव्यावरील सहकाऱ्यांकडे सादर केल्याचे दाखवले होते.
४ ऑक्टोबर रोजी जाधव यांच्याकडून आलेले मॅटमधील पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांना प्राप्त झाले. त्यांनी सदर कागदपत्रांची सखोल तपासणी केली असता, जाधव यांनी सादर केलेल्या पत्रावर पोलिस ठाण्यातील अंमलदारांचा बनावट शिक्का आणि खोट्या सह्यांचा वापर केल्याचे उघड झाले.
५ ऑक्टोबर रोजी पोलिस ठाण्यातील इतर अंमलदारांना विचारणा केली असता, त्यांनी अशा कोणत्याही कागदपत्रांची माहिती नसल्याचे सांगितले. यावरून जाधव यांनी न्यायाधिकरणाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, विवेक जाधव यांच्याविरुद्ध ठाणे शहरातील नौपाडा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
