Latest Posts

रेल्वेच्या धडकेत टी-४० (बिट्टू)वाघाचा मृत्यू : गोंदिया–बल्लारशाह रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा पट्टा ठरत आहे

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गोंदिया – बल्लारशाह रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा वन्यजीवांच्या मृत्यूची घटना घडली आहे. रविवारी १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास वाजता सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कारगाट येथील रेल्वे ट्रॅकवर ट्रेनच्या धडकेत नर वाघ (टी-४०) जागीच ठार झाला. ही घटना कक्ष क्रमांक १३३८/७४१ येथे घडली असून, मृत वाघ सुमारे १४ वर्षांचा बिट्टू नावाने ओळखला जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाहून बल्लारशाहकडे येणाऱ्या गाडीची धडक बसल्याने वाघाचा मृत्यू झाला. टी-४० बिट्टू हा प्रसिद्ध नर वाघ जयचा पिल्लू होता. अत्यंत आकर्षक व हष्टपुष्ट देहयष्टीमुळे बिट्टू हा पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. अनेक पर्यटक त्याच्या दर्शनासाठी तासन्‌तास जंगलात थांबत असत.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सांयकार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पशुवैद्यक डॉ. सुरपाम यांनी पंचनामा करून वाघाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी टीटीसी, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला. या वेळी उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, स्वॉब संस्थाध्यक्ष यश कायरकर, एनटीसीए सदस्य मुकेश भांदककर आदी उपस्थित होते.

दरवर्षी या गोंदिया–बल्लारशाह रेल्वे मार्गावर वाघ, हरीण, सांबर, अस्वल अशा अनेक वन्यजीवांचे रेल्वे अपघातात बळी जातात. परिणामी हा रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, या भागात प्राण्यांच्या हालचालीसाठी सुरक्षित अंडरपास किंवा ओव्हरब्रिजची गरज असून, योग्य उपाययोजना न केल्यास अशा घटना भविष्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Latest Posts

Don't Miss