Latest Posts

राज्यात एकाच दिवशी तीन भीषण आगींचा कहर : सुदैवाने जीवितहानी टळली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai): राज्यातील विविध भागांमध्ये सोमवारी आणि रविवारी रात्रीच्या सुमारास तीन ठिकाणी लागलेल्या भीषण आगीच्या घटना समोर आल्या आहेत. यात ठाण्याच्या भातसानगरमधील प्लास्टिक कंपनी, घाटकोपरमधील व्यावसायिक इमारत आणि कुर्ला येथील ऑटोमोबाइल्सच्या गाळ्यांचा समावेश आहे. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तीय नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

१ एस.के.आय. प्लास्ट कंपनीला लागली आग – भातसानगर, ठाणे –
आसनगाव औद्योगिक परिसरातील आदर्शनगरमधील एस.के.आय. प्लास्टिक उत्पादक कंपनीला सोमवारी सकाळी १० च्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीत अचानक धुराचे लोळ उठू लागल्याने कामगारांनी प्रसंगावधान राखून बाहेर धाव घेतली आणि जीवितहानी टळली.

आग लागल्यावर शहापूर नगरपंचायत, जिंदाल कंपनी, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब आणि २२ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

– ही आग इतरत्र पसरू नये याची तातडीने खबरदारी घेतली,
– राहुल चंदे, उपसरपंच, आसनगा

२ घाटकोपर एमआरआय सेंटरला आग; २५० कर्मचाऱ्यांनी टेरेसवर धाव घेतली –
मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील ९ मजली गोल्डन क्रश बिझनेस पार्क इमारतीत सोमवारी दुपारी आग लागली. तळमजल्यावरील निवारण एमआरआय सेंटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. तेथे उपस्थित रुग्णांसह इमारतीत काम करणारे सुमारे २५० जण टेरेसवर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेत अग्निशमन दलाचे जवान वैभव राणे धुरामुळे गुदमरले, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी ५:५० च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली.

३ कुर्ल्यात मध्यरात्री आगीचा डोंब; २० ऑटोमोबाइल गाळे खाक –
रविवारी मध्यरात्री २:३० वाजता मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रोडवर ऑटोमोबाइल्सच्या सुट्या भागांचा साठा असलेल्या गाळ्यांना आग लागली.या आगीत १५ ते २० गाळे पूर्णपणे जळून खाक झाले. अंदाजे  ३ हजार चौरस फूट परिसरात आगीचा फैलाव झाला. ४ फायर इंजिन्स आणि १० जंबो वॉटर टँकरच्या सहाय्याने तब्बल ५ तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात आली. या ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.

आग प्रतिबंधक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह –
या सलग आगीच्या घटनांमुळे राज्यभरात आग प्रतिबंधक उपाय, शॉर्टसर्किट नियंत्रण, आणि औद्योगिक सुरक्षेच्या नियमानुसार निरीक्षण आवश्यक असल्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Latest Posts

Don't Miss