विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune): नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने पुणे एसटी विभागातर्फे साडेतीन शक्तिपीठ दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेसाठी शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड व मंचर आगारांतून एकूण ११ विशेष बस रवाना करण्यात आल्या.
या विशेष यात्रेतील बस २७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता रवाना झाल्या. यातून सुमारे ४०० भाविकांनी यात्रा केली असून १२ लाख रुपयांचे उत्पन्न पुणे एसटी विभागाला मिळाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
या यात्रेत कोल्हापूर (महालक्ष्मी), तुळजापूर (तुळजाभवानी), माहूर (रेणुका देवी) ही तीन पूर्ण शक्तिपीठे आणि वणी (सप्तशृंगी देवी – अर्धे शक्तिपीठ) यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी भाविकांनी कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर तुळजापूर येथे मुक्काम करण्यात आला.
भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने बससेवा राबवण्यात आली. काही गटांनी ऑनलाईन बुकिंगद्वारेही सहभाग नोंदवला. शिवाजीनगर आगारातून सर्वाधिक – सात – बस सोडण्यात आल्या. याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे शिवाजीनगर आगारप्रमुख संजय वाळवे यांनी सांगितले.
