विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नाशिक (Nashik) : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात लवकरच स्वदेशी बनावटीचे आणि अत्याधुनिक तेजस Mk१A लढाऊ विमान दाखल होणार आहे. येत्या १७ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या सुविधेतून या विमानाचे पहिले उड्डाण होणार असून, या ऐतिहासिक क्षणाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
या कार्यक्रमावेळी राजनाथ सिंह हे आणखी दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत. यामध्ये हिंदुस्तान टर्बो ट्रेनर (HTT-४०) साठी दुसऱ्या उत्पादन लाइनचाही समावेश आहे. या उपक्रमामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी मिळणार असून, देशातील विमाननिर्मिती क्षमतेत मोठी झेप घेतली जाणार आहे. त्यामुळे १७ ऑक्टोबर हा दिवस भारतीय संरक्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.
६२ हजार ३७० कोटींचा ऐतिहासिक करार –
तेजस Mk1A च्या समावेशामागे संरक्षण मंत्रालयाचा ६२ हजार ३७० कोटी रुपयांचा HAL सोबतचा भव्य करार आहे. या करारानुसार भारतीय हवाई दलाला ९७ तेजस Mk1A विमाने मिळणार असून, त्यामध्ये ६८ सिंगल-सीट लढाऊ आणि २९ ट्विन-सीट ट्रेनर विमाने असतील. हा करार मेक इन इंडिया अभियानातील सर्वात मोठ्या यशस्वी पावलांपैकी एक मानला जात आहे.
मिग-२१ ची जागा तेजस घेणार –
भारतीय हवाई दलातील जुन्या मिग-२१ विमानांची जागा आता अत्याधुनिक तेजस Mk१A घेणार आहे. हे विमान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असून, यात AESA रडार, स्व-संरक्षण कवच, आणि प्रगत नियंत्रण प्रणाली यांसारखी तंत्रज्ञाने बसवण्यात आली आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाची स्क्वाड्रन ताकद अधिक भक्कम होणार असून, देशाच्या हवाई संरक्षण क्षमतेत ऐतिहासिक वाढ होणार आहे.
तेजस Mk१A च्या आकाशात होणाऱ्या या उड्डाणाने भारताच्या तंत्रज्ञान कौशल्याचा आणि आत्मनिर्भरतेच्या शक्तीचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
