विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) ऑनलाइन सफारी बुकिंग संकेतस्थळावर हॅकिंग झाल्याचा आणि ८० टक्के तिकिटांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचा सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा पूर्णपणे निराधार असल्याचे ताडोबा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी सफारी बुकिंगची सुविधा mytadoba.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, ही ऑनलाइन बुकिंग प्रणाली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र मार्फत संचालित केली जाते. ताडोबामध्ये पर्यटनासाठी कोअर आणि बफर असे दोन विभाग असून, या दोन्ही विभागांतील सफारीसाठी ऑनलाइन तिकिटे उपलब्ध करून दिली जातात.
दरम्यान, २० मे २०२६ रोजी यूट्यूबसह विविध सोशल मीडिया माध्यमांवर एक पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. त्यामध्ये ताडोबाच्या बुकिंग संकेतस्थळावर हॅकिंग झाल्याचा तसेच एका अज्ञात व्यक्तीकडून ऑनलाइन तिकिटांपैकी ८० टक्के तिकिटांची विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला होता.
या दाव्यानंतर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र च्या तांत्रिक पथकाने संपूर्ण बुकिंग प्रणालीची सखोल तपासणी केली. तपासानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात संकेतस्थळावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा भंग झाल्याचे पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट दिशाभूल करणारी असून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसारित करण्यात आल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित पोस्टविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपासानुसार घडामोडींची माहिती वेळोवेळी देण्यात येईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. प्रभू शुक्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
