विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल तालुक्यातील गडिसुर्ला गावात मंगळवारी २६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः थैमान घालत पाच बालकांसह १२ जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. या भीषण घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. कुत्र्याने एका बकरीलाही जखमी केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.
जखमींमध्ये अमित मोहुर्ले (४), वैशू सतीश आंबटकर (५), स्वरांगी सुभाष भेंडारे (४), संकल्प नितेश निकुरे (३), आरुष सुरज गुरुनुले (३), वंदना विलास जांपलवार (४०), बंडू काशिनाथ वाळके (५०), निकिता सुभाष भेंडारे (२५), समीक्षा रमेश शेंडे (१८), रोशना गोविंदा कावडे (२२), अवनी सागर बलगमवार (१०) तसेच एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय प्रेमदास लेनगुरे यांच्या बकरीलाही कुत्र्याने चावा घेत गंभीर जखमी केले.
माहितीनुसार, काही बालके घराबाहेर खेळत होती, तर महिला व नागरिक दैनंदिन कामासाठी बाहेर पडले होते. याचवेळी अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला चढवला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे गावात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. अनेकांच्या हातापायांना आणि शरीराच्या विविध भागांना कुत्र्याने चावा घेतल्याने रक्तबंबाळ अवस्था निर्माण झाली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत सर्व जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जखमी बालकांचा टाहो आणि पालकांची झालेली गर्दी हृदय पिळवटून टाकणारी होती. डॉक्टरांनी सर्वांवर तातडीने उपचार करत रेबिज प्रतिबंधक लसीकरण केले. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे.
दरम्यान, गावातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
