Latest Posts

इस्राईलमध्ये रोजगाराची संधी : होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : निश्चयाचे धोरण, भविष्याची नांदी। महाराष्ट्राची महाभरारी या ध्येयासह महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील कुशल व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी इस्राईल देशात रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकार आणि इस्राईल सरकार यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत होम बेस्ड केअरगिव्हर क्षेत्रातील ३ हजार ५०० पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या माध्यमातून उमेदवारांना इस्राईलमधील नॉन वॉर झोन भागात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळणार असून, मासिक वेतन सुमारे रुपये १ लाख ९९ हजार ७७० पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

या पदांसाठी उमेदवारांनी काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांमध्ये निपुण किंवा पारंगत असणे आवश्यक आहे. भारतीय नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त किमान ९९० तासांचा कोर्स (ओजेटी सहित) पूर्ण केलेले प्रमाणपत्र आवश्यक असून, मिडवाइफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी किंवा नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण घेतलेले असावे. किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून GDA, ANM, GNM, B.Sc. Nursing तसेच Post B.Sc. Nursing धारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांना इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक असून २५ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.

महाराष्ट्र शासनामार्फत निवड प्रक्रिया, नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिसा व पासपोर्टसंदर्भातील मार्गदर्शन, मेडिकल विमा, राहण्याची व जेवणाची सोय तसेच इस्राईलमध्ये सुरुवातीच्या काळात आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी माहितीची पडताळणी करून www.maharashtrainternational.com या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss