विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur): कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील अर्जुनी (तुकुम) येथे उघडकीस आली आहे. आईवर होत असलेल्या सततच्या अत्याचाराचा संताप अनावर झाल्याने मुलानेच वडिलांवर जीवघेणा हल्ला करत त्यांच्या छातीत लोखंडी सब्बल खुपसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारोती दडमल (७०) हे पत्नी ठकाबाई दडमल (६४) व दोन मुलांसह राहत होते. मारोती दडमल हे पत्नी व कुटुंबीयांना नेहमी शिवीगाळ व वाद घालत असल्याने घरात दीर्घकाळापासून तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर २० एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास मुलगा संदीप दडमल ( २४) हा वरोरा येथून घरी परतल्यानंतर वडिलांना जाब विचारू लागला.
वाद चिघळताच संतप्त संदीपने घरातील लोखंडी सब्बल उचलून वडिलांच्या छातीत जोरदार प्रहार करत ती थेट खुपसली. या भीषण हल्ल्यात मारोती दडमल यांच्या छातीत खोल जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच आई ठकाबाई यांनी तातडीने हस्तक्षेप करून जखमींवर प्राथमिक उपचार केले.
हल्ल्यानंतर आरोपी संदीपनेच जखमी वडिलांना मोटारसायकलवरून वरोरा येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटनेनंतर आई ठकाबाई दडमल यांनी शेगाव (बु.) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी मुलगा संदीप मारोती दडमल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे गंभीर उदाहरण ठरत आहे. पुढील तपास शेगाव (बु.) पोलीस करीत आहेत.
