विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुणे महापालिकेने मोठा पुढाकार घेत सर्व ३०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, ९१ शाळांमध्ये ८६२ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ९० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी ४ कोटी रुपयांच्या पूर्वगणनपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.
बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. पुणे महापालिकेने याच आदेशानुसार जुन्या हद्दीतील आणि नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील एकूण ३०० शाळांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात शाळेतील खोल्या, मजले, मोकळी जागा, प्रवेशद्वारे आदींची माहिती संकलित करण्यात आली.
महापालिकेच्या विद्युत व शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ९१ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी ९० शाळांमध्ये ४ कोटी रुपये खर्चून बसविले जाणार आहेत. यानंतर उर्वरित १५० शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.
दरम्यान, अलीकडच्या काळात खासगी आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये शाळांतील कर्मचारी, शिक्षक, बसचालक यांच्याकडून मुलींना लक्ष्य केले गेल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात मुलींच्या शाळांना प्राधान्याने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या शाळांची संख्या ३०० हून अधिक असून त्या सुमारे दीडशे इमारतींमध्ये चालवल्या जातात. काही शाळांकडे मोठी मैदाने असून सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात कचरा टाकणे, शाळेतील साहित्य चोरी, रात्रीच्या वेळी नशेखोरांचा वावर, गुन्हेगारी कृत्ये अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविणे अत्यावश्यक ठरले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक बळकट होईल, तसेच पालकांचा शाळांवरील विश्वास वाढण्यास हातभार लागेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
