Latest Posts

एसटीला प्रवाशांचा झटका : आवडेल योजनेत भाडेकपात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून एसटी महामंडळाने प्रवास भाड्यांत वाढ केली. मात्र या भाडेवाढीचा प्रवाशांनी तीव्र निषेध केला. लालपरीचे लाड बंद करत अनेकांनी खासगी वाहतुकीकडे वळण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट सुरू झाला. अखेर भानावर आलेल्या एसटी प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवडेल तेथे प्रवास योजनातील पास दरात लक्षणीय कपात जाहीर करत प्रवाशांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

गेल्या दोन वर्षांत एसटीच्या बसेसना भरघोस प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांनी गाड्या खचाखच भरून प्रवास केला आणि महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. याच वाढत्या मागणीचा फायदा घेत २४ जानेवारी २०२५ पासून तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून आवडेल तेथे प्रवास योजनेतून मिळणाऱ्या पासचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आले.

मात्र एसटीच्या जुनाट बसेस, सेवेत असलेली त्रुटी आणि भाडेवाढ यामुळे प्रवाशांचा संयम सुटला. प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब सुरू झाला. परिणामी गेल्या सहा महिन्यांत प्रवाशांची संख्या घटू लागली आणि उत्पन्नात मोठी तूट निर्माण झाली.

आता दर कपात – प्रवाशांना दिलासा –
सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अखेर महामंडळाने ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणाऱ्या दर कपातीतून प्रवाशांना दिलासा दिला आहे. याबाबतचे अधिकृत परिपत्रक शनिवारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले.

सुधारित पास दर –
पास प्रकार             |जुना दर  नवा दर  कपात

४ दिवसांचा पास (प्रौढ)  १८१४       १३६३     ४५०
४ दिवसांचा पास (मुले)   ९१०        ६८५       २२५
७ दिवसांचा पास (प्रौढ)  ३१७१       २३८२      ७८९
७ दिवसांचा पास (मुले)   १५८८       ११९४      ३९४

महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी एक संधी निर्माण झाली आहे. मात्र ही भाडेकपात टिकाऊ ठरेल की केवळ तात्पुरता उपाय ठरेल, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, लालपरीला पुन्हा जुने दिवस यावेत यासाठी सेवेतही सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी प्रवाशांची स्पष्ट भावना आहे.

Latest Posts

Don't Miss