विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / ताडकळस (परभणी)(Prabhani): सोयाबीनची कापणी करून घरी परतणाऱ्या महिला मजुरांना भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पूर्णा–सिंगणापूर मार्गावर घडली. या अपघातात दुचाकीस्वारासह एक महिला मजूर ठार झाली असून, अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मृतांमध्ये शेख शमीनाबी शेख नूर (रा. ताडकळस, ता. पूर्णा) आणि दुचाकीस्वार गौतम लिंबाजी मस्के यांचा समावेश आहे. तर शेख मुमताज शेख अजमोद्दीन व शेख समीना शेख हमीद या दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत.
घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी शमीनाबी, मुमताज आणि समीना या तिघी महिला मजूर सोयाबीनची कापणी करून घराकडे परतत होत्या. दरम्यान, पूर्णा–सिंगणापूर मार्गावरील एका गॅस एजन्सीजवळ पोहोचताच, मागून येणाऱ्या दुचाकी (क्रमांक एमएच २२ बीजी १४३९) ने तिघींना जबर धडक दिली. धडकेचा जोर एवढा होता की तिघी महिला गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तत्काळ परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शेख शमीनाबी शेख नूर यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गौतम मस्के यांनीही घटनास्थळीच प्राण सोडले.
या प्रकरणी शेख मुक्रम शेख शरफोद्दीन यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
