Latest Posts

महाकाली दर्शनावरून परतताना भीषण अपघात : ऑटो पलटीत एकाचा मृत्यू, अनेक जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : महाकाली देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी शहरातील गांधी चौक परिसरात घडली.

या घटनेत काही जण जखमी झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.परमेश्वर विठोबा गंधपवाड (वय ७९) रा. ब्राम्हणगाव ता. उमरखेड जि. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रामा दत्ता टेकाळे (७८) हे आपल्या कुटुंबीयांसह व गावातील इतर १० भाविकांसोबत १४ एप्रिल रोजी नंदीग्राम एक्सप्रेसने चंद्रपूर येथे महाकाली देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर सर्व भाविकांनी मंदिर परिसरात मुक्काम केला होता.

बुधवारी १५ एप्रिल रोजी  सकाळी सुमारे ६.३० वाजता हे सर्वजण ऑटो क्रं. एमएच ३४ डी ८३२६ ने रेल्वे स्थानकाकडे जात असताना गांधी चौकाजवळ सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटी झाला.

या अपघातात परमेश्वर विठोबा गंधपवाड (७९) यांना गंभीर दुखापत झाली, तर पुण्यरता रामा टेकाळे यांच्या कपाळाला मार लागून त्या जखमी झाल्या. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीदरम्यान परमेश्वर गंधपवाड यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे भाविकांमध्ये शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, चंद्रपूर शहर पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), २८१ तसेच मोटार वाहन अधिनियम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र रुद्रपवार करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss