Latest Posts

निगडीत पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग : चालकाच्या तत्परतेने प्रवाशांचा जीव वाचला

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पिंपरी चिंचवड : मधुकर पावळे उड्डाणपुल परिसरात शुक्रवारी (१०) दुपारी साडेतीनच्या सुमारास पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिकल बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रवाशांच्या तत्परतेने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ३०३ क्रमांकाची निगडी–आकुर्डी शटल इलेक्ट्रिकल बस आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना मधुकर पावळे उड्डाणपुलाजवळ अचानक बसच्या मागील भागातून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीचे लोट दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बसचे दरवाजे उघडले, तर प्रवाशांनी खिडक्यांच्या काचा फोडून आतला धूर बाहेर काढत आपले जीव वाचवले.

घटनेची माहिती मिळताच निगडी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ टाळला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तत्काळ परिसर बंद करून वाहतूक सुरळीत केली.

या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, बसच्या इलेक्ट्रिकल सिस्टममधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून अचूक कारण पीएमपीएमएल प्रशासनाच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Latest Posts

Don't Miss