– ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
– गावकऱ्यांनी जाणून घेतल्या प्रकल्प कार्यालयाच्या योजना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातींच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी भामरागड आणि एटापल्ली केंद्रामधे कलापथकाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात शैक्षणिक योजना, शेतीविषयक योजना, केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजना अशा अनेक योजनांचा सामावेश होत असतो. भामरागड तथा एटापल्ली केंद्रातील अनुसूचित जमातीच्या लोकांपर्यंत पथनाट्य, गोंडी गीत, गोंडी नृत्याच्या माध्यमातून शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनमुक्ती, कुपोषण, शिक्षण या विषयावर प्रबोधन करण्यात आले.
कलापथकाचे सादरीकरण एटापल्ली व भामरागड केंद्रातील चंदनवेली, गेदा, जीवनगट्टा, उडेरा, कांदोळी, ताळगाव, हेमलकसा, धोडराज, लाहेरी व भामरागड या गावात करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजन रोशना चव्हान, प्रकल्प अधिकारी, भामरागड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
कलापथकाचे सादरीकरण राहुल पेंढारकर, सुमित रामटेके, गणेश मडावी, नयन गेडाम, संदीप आलाम, रमेश आलाम, वंदेश आवळे, टिना उराडे, पायल सिंग यांनी केले. कलापथकाच्या कार्यक्रमात गावातील पोलीस पाटिल, नगर सेवक,सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामवासी उपस्थित होते.
