– तिडंगी गावासह जिल्ह्यातील ४२ ठिकाणी आदिवासी पारधी समाजासाठी विशेष कॅम्पचे होणार आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): कोणत्याही अवैध प्रकारचा मार्ग हा अधोगतीकडे नेणारा असतो. जागृत समाजाचे ते लक्षण नसून जे कोणी अशा मार्गाला वळले आहेत त्यांना अशा अवैध मार्गापासून परावृत्त करण्यासह नवीन संधीसाठी व रोजगारासाठी शासनासह समाजही तत्पर असणे महत्वाचे आहे. तिडंगी येथील अवैध दारु व्यवसायाकडे वळलेल्या लोकांना त्यांच्या आवडीनुरुप विधायक मार्ग मिळावेत, स्वयंरोजगार मिळावा यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यादृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
तिडंगी गावातील आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे करण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परिषदेच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली. आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या नेतृत्त्वात हे शिष्टमंडळ भेटले. निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, आदिवासी पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष बबन गोरामन, उपाध्यक्ष सतीश माळी, जिल्हाध्यक्ष अनिल पवार व समाजातील विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजना या लाभधारकांच्या गरजेनुरुप कशा देता येतील याचा विचार केला पाहिजे. यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना दिले. एखादा नवा व्यवसाय निवडतांना लाभधारकाचा पसंतीक्रम हा आवश्यक असतो.
ज्यांना शेळी पालनात रस असेल अशा व्यक्तींसाठी शेळीपालन तर इतर व्यक्तीला दुसरा व्यवसाय करावा वाटत असेल तर तो दिला पाहिजे. कुटीर उद्योग यासह आदिवासी शबरी योजना व इतर विविध योजना प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. यादृष्टीने तिडंगी येथे एक स्वतंत्र शिबीर घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून विविध योजना तिडंगी येथे आदिवासी पारधी समाजाच्या घराघरात पोहचल्या पाहिजेत. यासाठी शिलाई मशिन व इतर योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिल्या. जिल्ह्यात ४२ ठिकाणी असलेल्या आदिवासी पारधी वस्त्यांवर विशेष कॅम्प घेण्याचे या बैठकीत ठरले.
