Latest Posts

पंतप्रधान इंटर्नशिप योजने ला तरुणांचा उत्साह कमी, सरकार चिंतेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली (New delhi): देशातील लाखो तरुणांना रोजगार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ला (पीएमआयएस) अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे सरकार चिंतेत असून, या योजनेत सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरातील ३५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून केवळ ८ हजार ७६० उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष इंटर्नशिपला सुरुवात केली आहे. सरकारने देशातील प्रमुख ५०० कंपन्यांमार्फत १.२७ लाख इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यासाठी तब्बल ६.२१ लाख अर्ज प्राप्त झाले, मात्र ऑफर मिळाल्यानंतर केवळ २८ हजार उमेदवारांनीच स्वीकार केला आणि अखेरीस ८ हजार ७६० तरुणच प्रत्यक्षपणे रुजू झाले.

दुसऱ्या फेरीत २४ हजार  हून अधिक उमेदवारांनी इंटर्नशिपसाठी ऑफर स्वीकारल्या असल्या तरी प्रत्यक्ष रुजू होणाऱ्यांची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही.

अपेक्षेपेक्षा कमी सहभाग –

या योजनेअंतर्गत ३२७ कंपन्यांनी १.१८ लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या. ४.५५ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आणि ८२,००० ऑफर देण्यात आल्या, मात्र प्रत्यक्ष इंटर्नशिप सुरू करणाऱ्यांची संख्या अत्यल्प राहिली. सूत्रांच्या मते, हा प्रतिसाद निराशाजनक असून, सरकारला अपेक्षित उद्दिष्ट साध्य झालेले नाही.

स्टायपेंड वाढवण्याचा सरकारचा विचार –

तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकार आता या योजनेतील स्टायपेंड (विद्यावेतन) वाढवण्याचा आणि इतर सुधारणा करण्याचा विचार करत आहे. सध्या पीएमआयएस*अंतर्गत प्रत्येक उमेदवाराला दरमहा ५ हजार  रुपये स्टायपेंड आणि एकदाच६,००० रुपयांची जॉइनिंग ग्रँट दिली जाते.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी या योजनेचा शुभारंभ केला होता. एका वर्षात १.२५ लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

राज्यनिहाय इंटर्नशिप करणाऱ्यांची संख्या –

उत्तर प्रदेश : १२४१

आसाम : ९९७

महाराष्ट्र : ४१९

हरयाणा : २८९

गुजरात : २४९

पंजाब : ६०

गोवा : ३

मिझोरम : १

कमी स्टायपेंड, संधींचे असमान वितरण आणि प्रचाराचा अभाव ही कारणे या योजनेला कमी प्रतिसाद मिळण्यामागे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Latest Posts

Don't Miss