विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची घोषणा केलेली आहे.
ही योजना पुढील पाच वर्षाकरिता देशातील महत्वाच्या ५०० कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिप च्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविली जाणार आहे. ही योजना भारत सरकार वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत राबविली जाणार आहे.
पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी देशातील सर्वोच ५०० कंपन्यामध्ये इंटर्नशिप ची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या कंपन्या कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत कॉर्पोरेट सोशल रीस्पोन्सिबिलीटी (CSR) उपक्रमामध्ये सहभागी असणे आवश्यक आहे. मानधन हे DBT द्वारे उमेदवाराच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येईल.
भारत सरकार प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेतर्गत उमेदवारास विमा कवच उपलब्ध करून देणार आहे. या योजनेत पूर्णवेळ शिक्षण घेत असलेले किंवा नोकरी करत असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाही. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८ लक्ष पेक्षा जास्त नसावे किंवा कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसावे. या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे २१ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे.
यासाठी उमेदवार https://pmintership.mca.gov.in या संकेतस्थळावर नोदणी करू शकतात. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन योगेंद्र शेंडे ,सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
